अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणासाठी तब्बल ११ व्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती घणाघाती प्रहार सुरू ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील हे शिंदे यांच्याच इशार्यावर उपोषण करत आहेत, असा आरोप केला जात होता, मात्र आता थेट शिंदे यांच्याच विरोधात जरांगे पाटील यांनी मोर्चा उघडल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिंदे यांचा काल एकेरी उद्धार केल्यानंतर आज पुन्हा जरांगे पाटील यांनी शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे.
सापडलेल्या ५८ लाख नोंदींवरून मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. जर ५८ लाख नोंदी सापडलेल्या नाहीत, तर एकनाथ शिंदेंनी स्पष्ट करावं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं की अशा ५८ लाख नोंदी सापडलेल्या नाहीत. तिकडे शिंदेंनी तरी सांगावं की मी फसवलेलं नाही, ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे जर भाजपने अशा पद्धतीने नोंदी कमी केल्या तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतील. पक्षाशी ज्या पद्धतीने गद्दारी केली तशी आमच्याशी गद्दारी का केली? असे मराठे विचारतील, अशी खोचक टीका जरांगे पाटील यांनी केली.
...तर शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती
शिंदे यांच्या परभणी दौर्यावरून सुद्धा जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शिंदे यांनी परभणी दौरा रद्दच केला होता; मात्र पुन्हा १० मिनिटांनी कोणत्यातरी अधिकार्याने जरांगे पाटलांनी सूट दिली आहे असा मेसेज देताच त्यांनी परभणी दौरा केल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. आम्ही जर भिडलो असतो तर शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती, असा सुद्धा दावा जरांगे यांनी केला.
त्यांच्यासाठी दोन संविधानिक असतात
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेची दारं खुली आहेत या वक्तव्यावर रांगे पाटील यांनी टीका केली. आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे असं आम्ही म्हटलं नाही, असं जरांगे म्हणाले. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मोजत नाही, आम्ही मोकळं आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की संविधानिक म्हणजे काय ते त्यांनाच माहिती असेल. जे भ्रष्ट लोकं आहेत, ते भाजपमध्ये आहेत ते संविधानिक आहेत; ज्यांच्यावर काहीच आरोप नाहीत ते जेलमध्ये आहेत, त्यांच्यासाठी दोन संविधानिक असतात, असा टोला सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. दरम्यान, शिंदे यांच्या सभांवरून सुद्धा जरांगे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की शिंदेंच्या सभा लाखामध्ये सभा होत होत्या, मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त होत होत्या, मात्र कुठं नेऊन ठेवलं सगळं? मराठ्यांच्या विरोधामध्ये गेल्यानंतर काय होतं बघा, ही राजकीय अवकळा आली असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.